युवकांच्या कल्याणार्थ प्रामाणिकपणे काम करणारी एकमेव संघटना | व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक

संस्थेचा इतिहास

संस्थेची स्थापना- ११ मे २०००

स्थळ- छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतापक्षेत्र किल्ले प्रतापगड



भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना युवकांच्या व्यसनांच्या दुर्बलतेचा व मानसिक पारतंत्र्याचा विचार आला व या गुलामीतुन तरूण मुक्त व्हावेत या विचाराने दि. १५ ऑगस्ट १९९६ रोजी भादे ता. खंडाळा जि. सातारा येथील कीर्तनात गुरूवर्य बंडातात्या कराडकर यांनी हे विचार प्रगट केले व मुलांना अवाहन केले. कदाचित एकही तरूण प्रवृत्त होणे शक्य नाही असे वाटत असतानाच ३० मुलांची नावे मिळाली व आश्चर्य वाटले.



आपण मार्गदर्शन केल्यास तरूण मुले सहज बदलतील व व्यसनमुक्त होतील याची खात्री वाटली व तेथुन पुढे प्रत्येक कीर्तनात हा प्रचार चालू ठेवला. या प्रचारात असा अनुभव आला की अनेक वर्ष दारूसारखे भयंकर व्यसन असणारी माणसे सुध्दा व्यसनांपासून परावृत्त होतात हेच काम सांघिकपणे केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल व बहुसंख्य तरूण व्यसनमुक्त होतील हा विश्वास वाटल्याने अशा मुलांची संघटना तयार करण्याचे ध्येय बाळगले. दि. ५ मे २००० ते १२ मे २००० या कालावधीत युवकांना एकत्र करून श्री छत्रपती शिवरायांचे प्रतापक्षेत्री या कालोचित कार्यास प्रारंभ केला व हा संघटनेचा पहिला संस्कार सोहळा प्रतापगड येथे संपन्न झाला या सोहळ्यामध्येच गुरूवार दि. ११ मे २००० रोजी युवकमित्र ह.भ.प. बंडातात्या कराडकर यांनी व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेची स्थापना करून श्री. सचिन शिंदे यांची संघटनेचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केली. या सोहळयास सर्वश्री बाबासाहेब पुरंदरे, राजीवजी दिक्षीत, अण्णासाहेब हजारे, डॉ. कल्याण गंगवाल, इ. समाजसेवा धुरंधरांनी आपल्या अमोघ वाणीतून तेजस्वी विचार देऊन येथे जमलेल्या ध्येयवादी युवकांना मार्गदर्शन केले.



व्यसनांचे पाश व दुष्परिणाम जर कळाले तर कोणीही सदविवेकी नक्की बदलेल या विचारातून ’व्यसनमुक्ती प्रबोधिका’ या पुस्तकाचें प्रकाशन केलें. निर्भिडपणा, जिद्द, त्याग इ. अनेक गुण मुलांमध्ये आहेत व त्याचा उपयोग करून मुलांना ध्येयवादी बनविणे हे जाणत्यांचे काम आहे. उर्वरीत जीवनात हेच कार्य करण्याचे ध्येय बाळगून वरील पुस्तकाचे प्रकाशन स्व. राजीवभाई दिक्षीत यांचे शुभहस्ते करण्यात आले. व याच पुस्तकाच्या सुधारीत दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन श्री कल्याणजी गंगवाल यांचे शुभहस्ते करण्यात आले.



किल्ले प्रतापगड नंतर धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाने पवित्र झालेल्या श्री क्षेत्र तुळापूर, मुरारबाजी देशपांडे यांच्या वीरगतीने पावन झालेल्या किल्ले पुरंदर, हिंदवी स्वराज्याची राजधानी असणार्‍या राजतीर्थ किल्ले रायगड, तानाजी मालुसरे यांच्या अतुलणीय पराक्रमाने फत्ते झालेला किल्ले सिंहगड, बाजीप्रभू देशपांडे व वीर शिवा काशीद यांच्या हौतात्म्याने पुलंकीत झालेल्या किल्ले पन्हाळगड, हिंदू धर्म प्रसारक संत रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेला किल्ले सज्जनगड, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असलेला किल्ले शिवनेरी, छत्रपती संभाजी महाराजांच्या वीरश्रीने पावन झालेला किल्ले धर्मवीरगड (बहादूरगड), सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या जन्मस्थानी मौजे भोसरे जि. सातारा, छ. शिवाजी महाराजांच्या नंतर मराठयानी एकाकी लढून ५॥ वर्ष किल्ला औरंगजेबाच्या ताब्यात दिला नाही तो किल्ले रामशेज जि. नाशिक, स्वराज्याच्या सुरूवातीची पंचवीस वर्षे राजधानीचे ठिकाण असलेला किल्ले राजगड जि. पुणे, सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या बलीदानाने पावन झालेला किल्ले केंजळगड जि. सातारा, छ शिवाजी महाराजांचा स्वामीनिष्ठ सेवक फिरंगोजी नरसाळे यांच्या अतुल पराक्रमाने पुनीत झालेला किल्ले संग्रामदुर्ग (चाकण) ता. खेड जि. पुणे. या चौदा ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघाचे प्रतापी संस्कार सोहळे संपन्न झाले. प्रत्येक सोहळ्यामध्ये १०००-१५०० युवकांचा सहभाग होता.



व्यसनमुक्त युवक संघाच्या प्रतापी संस्कार सोहळ्याची वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत



१) संघटनेचा प्रत्येक प्रतापी संस्कार सोहळा हा ऐतिहासिक ठिकाणीच साजरा होत असतो. हेतू हा की मुलांमध्ये तिव्र देशभक्ती जागृत व्हावी.



२) या सोहळयामध्ये शक्यतो युवकांनाच प्रधान्य दिले जाते.



३) व्यसन असलेले युवक व प्रौढ यांनाही सहभागी करून घेतले जाते व त्यांच्यावर योग्य पध्दतीने संस्कार करून त्यांना व्यसनमुक्त करण्यात येते.



४) या सोहळयांमध्ये व्यासपीठावर अशाच व्यक्तींना निमंत्रित केले जाते की, ज्यांचे जीवन खरोखरच आदर्श व निष्कलंक आहे.



५) सोहळयामध्ये सहभागी होणारा प्रत्येक युवक स्वत:ची वर्गणी जमा करतो.



६) सोहळयात आयोजित केल्या जाणार्‍या कार्यक्रमांमध्ये संत साहित्याचे पारायण, व्याख्याने, प्रवचने, चर्चासत्र, कीर्तन, योगासने, सुर्यनमस्कार इ. समावेश असतो.



या सोहळयात योगदान देऊन ज्ञानदान करणार्‍या काही आदर्श व्यक्ती प्रामुख्याने श्री. बाबासाहेब पुरंदरे, स्व. राजीवजी दिक्षीत, जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे,श्री. बाळासाहेब भारदे, स्व,. शाहीर योगेश, स्व. शेलार मामा, श्री. संभाजीराव भिडे गुरुजी, श्री. आण्णा महाराज नारायणपूर, श्री. आण्णासाहेब जाधव, डॉ. कल्याण गंगवाल. डॉ. रामचंद्र देखणे, श्री. पोपटराव पवार, राष्ट्रीय कीर्तनकार चारूदत्त आफळे, श्री. इंद्र्जीत देशमुख, श्री. अभय भंडारी, श्री. डॉ. अविनाश पोळ इ. आहेत.



मानवास असह्य दु:ख देणारी, मानवतेचा, सुख समृध्दीचा व पैशाचा नाश करणारी, सर्व विश्वास विध्वंस करणारी, मानवास धर्माच्या विरोधी घेऊन जाणारी, निसर्ग विरोधी घेऊन जाणारी निसर्ग विरोधी असलेली तसेच मानवांस जिवंत असून सुध्दा मानसिक व शारिरीक दृष्ट्या घात करणारी, मनुष्यास कलंकीत करणारी खालील दहा व्यसने आहेत. हया दहाही व्यसनांच्या विरोधी प्रचार व प्रसार करून संपूर्ण राष्ट्रातील अवघा युवक व्यसनमुक्त सदाचारी, सशक्त, स्वाभिमानी, स्वावलंबी, आदर्श व सत्पथगामी बनविण्याचा या सामाजिक संस्थेचा प्रयत्न आहे.