बोधवाक्य

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते
(ज्ञानसारखं पवित्र काहीही नाही)

वैशिष्ट्ये

रा राष्ट्र उभारणीमध्यें हे गुरुकुल क्लार्क बनवित नाहीं ते सक्षम नागरीक घडवितें.
ष्ट्र भारतीय संस्कृतीचें रक्षण व जोपासना हें आमचें ध्येय आहे.
बं बंधने येथे मार्काच्या जीवघेणी स्पर्धेची आम्हास नको आहेत, आम्हांस हवी आहे स्वाभिमानाने जगण्याची कला.
धु धुरंधरपणे येथें व्यायाम व चिंतनास प्राधान्य दिले जाते.
रा राबणूक आम्ही येथें करतों पोहणें, धावणें, खेळ, कुस्त्या व मल्लखांब प्रशिक्षण, इत्यादीची माहिती.
जी जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन आम्ही जोपासतों.
वसा आम्ही घेतला आहे श्रमदानाचा, तो आमचा आत्मा आहे तें करावेंच लागतें.
जी जीवन जगण्याची सुंदर कला आली पाहिजे हा आमचा आग्रह आहे.
दी दीनता, लाचारी, ओशाळपणा आम्हांस नको आहे, आम्हांस हवा आहे स्वाभिमान.
क्षि क्षणिक मोहापेक्षा शाश्वत सत्याचा मार्ग आम्हाला आवडतो.
तत्वाची आवड व सत्वाची निवड आम्हांस प्रिय आहे.
गु गुरुकुल पद्धतीच्या द्वारा आदर्श नागरीक घडविणें आमचा प्रयत्न आहे.
रु रुढीप्रिय समाजास बुद्धिप्रामाण्यवाद देण्याचे कार्य आम्ही करतो.
कु कुणावर अन्याय आम्ही करीत नाहीं पण कोणाचा अन्याय सहनही करीत नाहीं.
लवकर झोपणे लवकर उठणे ही आरोग्याची गुरुकिल्ली आम्ही विद्यार्थ्यांस देतो.
सं संपन्न व स्वतंत्र भारतीय नागरीक हे आमचे वेड आहे.
स्था स्थावर जंगम संपत्तीपेक्षा शीलाची संपत्ती प्रदान करणें आमचे कर्तव्य आहे.
 

दृष्टीकोन

शिक्षणाच्या मुलभूत उद्देश चारित्र्यसंपन्न व स्वावलंबी समाजनिर्मिती हा आहे. यास अनुसरून पुरातन काळापासून ऋषीमुनींनी भारतीय गुरूकुल शिक्षणपद्धतीचा ढाचा बनिविला होता व अगदी स्वातंत्रपुर्व काळापर्यंत तो भारतीय शिक्षणप्रणालीमध्ये अव्याहतपणे सुरू होतो, नंतरच्या काळात शिक्षणविषयक अभ्यासक्रमामध्ये जे अतिक्रमण झाले त्याचा प्रतिकार करण्यासाठी बरेच प्रयत्न झाले आहेत व आजही सुरू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणुन राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत गुरूकुलची स्थापना गुरूवर्य युवकमित्र बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करणेत आली आहे. संपुर्ण भारतीय गुरूकुल शिक्षणाद्वारे अध्ययन करणार्या विद्यार्थांचा सर्वांगीण व सम्यक विकास हा संस्थेचा उद्देश आहे.
 

संस्थापक संदेश

गुरुकुल शिक्षणपद्धती ही भारतीय शिक्षणपद्धतीचा गाभा आहे, कृत, त्रेता, द्वापार आणि आत्ताचे कलियुग यामध्ये मानवाच्या प्रदीर्घ उत्क्रांतीच्या वाटचालीत गुरुकुल शिक्षणसंस्थांचा सहभाग अनन्यसाधारण आहे. सर्वांसाठी सारख्याच सुविधा व कोणताही वर्णभेद न ठेवतां सर्व विद्यार्थीजनांना संस्कृत, इतिहास, गणित, विज्ञान, भाषा, भुगोल आदी विषयांचे यथार्थ ज्ञान देण्याबरोबरच राष्ट्रातील बालकांचा सर्वांगीण विकास हा गुरुकुलासंस्थांचा आत्मा होता. काळाच्या आेघात संस्कारित शिक्षण संकल्पना मागे पडत असून केवळ गुण संपादन करणेसाठी विद्यार्थी व पालक मृगजळाच्या पाठीमागे धावत आहेत परंतु केवळ अधिकाधिक गुण मिळविणे हा एकच निकष ठरवताना विद्यार्थीजनांचा सर्वांगीण विकास होताना अभावानेच निदर्शनास येत आहे. या सद्यस्थितीचे अवलोकन केले असता पुनःश्च गुरुकुल शिक्षणाकडे बहुतेक बालक व पालक आकृष्ट होत आहेत यांत काहीच नवल नाही कारण केवळ याच शिक्षणपद्धतीत बालकांच्या सर्वांगीण विकासाची क्षमता आहे. या सर्वांचा योग्य परामर्श घेत व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक व वारकरी संप्रदायाचे पाईक संतवीर गुरूवर्य युवकमित्र बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या उदात्त मानसातून राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षीत गुरुकुल संस्थेची स्थापना करण्यात आली आहे.
 

मुख्याध्यापक संदेश

शिक्षण ही अध्यापक व अध्ययन करणारे विद्यार्थी या दोहोंचाही सम्यक विकास साधणारी प्रक्रिया आहे. स्वामी विवेकानंद, आचार्य विनोबांचे शिक्षणविषयक विचार, विद्यार्थ्यांनी अर्जित केलेल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयाेग प्रत्यक्ष जीवन जगण्याच्या कसोटीमध्ये किती सहजपणे करता येतो यांवर शिक्षणाची उपयुक्तता सिद्ध होते असे आहेत. ही विचारसरणी कालातीत असून भारतामध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या व अध्यात्मपर तत्वज्ञानाच्या गाभ्याशी अतूट संबंध प्रस्थापित केलेल्या गुरुकुल शिक्षणपद्धतीचा अवलंब अलीकडे अत्यंत आवश्यक बनलेला आहे परंतु ही शिक्षणपद्धती आदीकाळापासून आजपावेतो भारतीय संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. परमआदरणीय शिक्षणमहर्षी कर्मवीर आण्णांच्या ‘कमवा आणि शिका’ याही विचारसरणीचा गाभा बहुतांशी गुरुकुल शिक्षणपद्धतीशी सांधा साधणारा आहे. या सर्व विचारसरणीचे योग्य अवलोकन करून व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचे संस्थापक व वारकरी संप्रदायाचे पाईक संतवीर गुरूवर्य युवकमित्र बंडा तात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांच्या उदात्त मानसातून राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षीत गुरुकुल संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. सध्या या संस्थेत १४० विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तकांतील ज्ञान शिकत नसून जीवनविद्या शिकत आहेत आगामी काळात हे गुरुकुलसंकुल भारतातीलच नव्हे तर अवघ्या विश्वातील एक आदर्श शिक्षणसंस्था असेल याची आम्हांस खात्री आहे व त्याकरताच आमचा यत्न सुरू आहे.