युवकांच्या कल्याणार्थ प्रामाणिकपणे काम करणारी एकमेव संघटना | व्यसनमुक्त सदाचारी युवक हाच खरा समाजसुधारक

काळ, काम आणि वेगाचं गणित - मा. श्री. अभयजी भंडारी साहेब, विटा


आपलं आयुष्यच मुळी काळ काम वेगाचं गणित असतं. योग्य नियोजनाने ठरवलेलं काम नेमक्या वेळेत उत्तम आहे. गुणवत्तेने करता आलं, कि मनुष्य यशस्वी होतो.

 

काळाचं भान खूप महत्त्वाचं असतं. आपल्याकडे एक अर्थपूर्ण म्हण प्रचलित आहे. बैल गेला मग झोपा केला. बैल आहे, तोपर्यंतच त्याच्यासाठी गोठा करायला हवा. गोठा बांधण्याचं नुसतं नियोजन केलं, पण प्रत्यक्षात गोठा बांधला नाही, तर काय उपयोग? आणि गोठा बांधला, पण ईतका काळ दवडून, कि तोपर्यंत बैल म्हातारा होवून त्याने जगाचा निरोप घेतला. मग गोठ्याचा उपयोग काय ?


कोणतीही गोष्ट योग्य वेळी करण्यात अर्थ आहे. विलंब झाला, तर जगण्यातली गंमत नाहीशी होते. योग्य वयात शिक्षण, योग्य वेळ व्यायामाला दिला, कि शरीर सुदृढ होतं, ते पुढे अनेक उत्तमोत्तम संकल्प सिद्धीस नेण्यात उपयुक्त ठरतं. योग्य वयात विवाह, मुलं बाळं, त्यांचं पालनपोषण, संस्कार, त्यांच्यासाठी योग्य वयात केलेल्या आर्थिक तरतुदी, हे सारं नेमकेपणाने योग्य वेळी व्हावं लागतं. हे करता करता अनेक कौशल्य शिकावी, ज्याचा अर्थार्जनासाठी उपयोग होईल. असं सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना ज्या समाजाचा आपण एक भाग आहोत, त्याबद्दल, त्याच्या सुखदुःखाबद्दल जाणून घेणं, त्याच्या हितासाठी काही परोपकार करण,स्वार्थ आणि परमार्थ यात संतूलन राखणं, हेही एक कौशल्य आहे.

 

हे सारं करताना जीवनाचा नेमका अर्थ काय ? जीवनाचा उद्देश काय ? आपल्याला नेमके काय मिळवायचे आहे ? किती मिळवायचे आहे ? या गोष्टींचे अनुसंधान हा ही जीवनातील महत्वाचा भाग आहे. नाहीतर रेल्वे सुटून गेल्यावर स्टेशनवर पोहोचल्यासारखे होईल. काळ समजून घेताना हे कळते, की गेलेला एकही क्षण आयुष्यात परत येत नाही. काळ एकमार्गी आहे.तो फक्त जातो, कधीच येत नाही. त्यामुळे प्रत्येक क्षण अत्यंत मोलाचा आहे. तो वापरताना अत्यंत कंजुष मनुष्यासारखा अगदी काटेकोरपणे वापरावा. कोणतेही काम हाती घेताना त्यासाठी किती वेळ लागेल, याचा अभ्यास करावा, त्या कामाचे टप्पे लक्षात घेऊन त्या त्या वेळेत ते पूर्ण होईल यावर लक्ष ठेवावे. त्यात काय अडचणी येऊ शकतात, याचा विचार अगोदरच करावा.

 

आपल्या देशात कायदेशीर समस्या कधीच ठराविक वेळेच्या मर्यादेत सोडवता येत नाहीत, त्यामुळे त्या मुळात उद्भवूच नयेत याची काळजी घ्यावी. तशा समस्या असतील असे वाटले, तर त्या बाबी पूर्ण होऊन निर्वेधपणे काम करता येईल, अशी खात्री झाल्यावरच कामाला सुरुवात करावी.


आपल्या भारताच्या नवीन संसद भवनाचे प्रचंड बांधकाम अत्यंत चांगल्या गुणवत्तेने अवघ्या दोन वर्षात टाटा कंपनीने पूर्ण केले. दिल्ली मेट्रो प्रकल्प आणि कोकण रेल्वे प्रकल्पही अत्यंत उत्तम गुणवत्ता राखत वेगाने (ठरलेल्या वेळे आधी) पूर्ण करण्याचे श्रेय श्री.ई. श्रीधरन यांना दिले जाते. त्यांना आदराने फादर ऑफ इंडियन प्रोजेक्ट मॅनेजमेंट असे म्हणतात.

 

या सारखे प्रकल्प यशस्वीपणे साकारताना कोणत्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन केले गेले, याचा ज्याला आयुष्यात काही भव्य दिव्य करायचे आहे, अशा प्रत्येकाने अभ्यास करावाच.

 

दिल्ली मेट्रोच्या अचूकतेसाठी एक मिनिट हा कालावधी ठरवल वेळा ती एका मिनिटापेक्षा कधीच उशिरा पोहोचली नाही. ई. श्रीधरन यांनी असे सांगितले, कि दिल्ली आहे. आणि दिल्ली मेट्रो रोज ज्या ज्या स्टेशन वर पोहोचते, त्या निर्धारित वेळेत ९९% मेट्रोने रोज किमान वीस लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांचा एक मिनिट वाचल्याने मी दररोज आपल्या देशाचा किमान वीस लाख मिनिटे इतका कामाचा वेळ वाचवतो. याची किंमत पैशात करताच येणार नाही.

 

काळाचे अध्ययन केल्यास राष्ट्रीय चारित्र्याला कसा आकार देता येतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. जशी वेळेची अचूकता महत्वाची, तशीच आपण जे ही काम करतो, त्यातली अचूकता, प्राविण्य, सफाईदारपणा हे सारे महत्वाचे असते.


सरकार ज्या संपत्तीने रस्ते बांधतेपूल बाधतेइमारती बांधतेपाण्याच्या योजना करतेत्यासाठी लागणारी संपत्ती सरकारला आपल्या समाजाने दिलेली असते.ती संपत्ती मिळवण्यासाठी लोकांना निरंतर कष्टच करावे लागतात. अशा संपत्तीतून निर्माण झालेले प्रकल्प सर्वोत्तम गुणवत्तेचे असतील तर तर त्यामुळे होणारी बचत ही राष्ट्रीय संपत्तीची बचत आहे. ते प्रकल्प निकृष्ट असतीलतर त्यात राष्ट्रीय संपत्तीचे मोठे नुकसान होतेजे अंतिमतः समाजातील प्रत्येकाचेच नुकसान ठरते.

 

फक्त खराब रस्त्यांमुळे वाहनांचेत्यांच्या टायर्सचे होणारे नुकसान आपल्या देशात दरवर्षी हजारो कोटींचे भरेल. दिल्लीत गेल्या वर्षी दोन बत्तीस मजली इमारती बेकायदेशीर असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पाडण्यात आल्या. त्यामुळे झालेले शेकडो कोटींचे नुकसान हे राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे असा प्रकार देशाच्या राजधानीत घडतो, त्याला कोण जबाबदार होते, हे सामान्य मनुष्याला जन्मात कधी समजणार नाही.

 

हे राष्ट्रीय चारित्र्याचे पतन आहे. त्याचा आत्ता असलेला वेग भयंकर असल्याने पुढच्या पिढीला आपण नेमकं काय देणार ? या विचाराने मन अस्वस्थ होतं. एक सामान्य माणूस म्हणून अशा आपल्या नियंत्रणात नसलेल्या असंख्य गोष्टींकडे व्यथित होऊन पाहतानासुद्धा आपण आपले काम उत्तम, चोख करण्याची सवय स्वतःला लावून घ्यावी, हे आपल्या स्वतःच्या आत्मिक समाधानासाठी आवश्यक आहे. थोडक्यात काळ काम वेगाचे गणित आपल्या छोट्याशा वैयक्तिक जीवनात अचूकतेने सोडवावे. त्यामुळे आपले भले होईलच, पण त्या प्रमाणात देशाचे, समाजाचेही भलेच होईल.

 

यालाच राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचा प्रारंभिक संस्कार म्हणता येईल. या सूत्रांचे पालन वैयक्तिक जीवनात, संघटनात्मक कार्यात, सामाजिक उपक्रमात असे सर्वत्र करायला हवे. नाहीतर आपली राष्ट्रीय प्रतिज्ञा नुसती म्हणण्याने काय होणार ? त्यातल्या आशयाप्रमाणे आपल्याला वैयक्तिक आणि राष्ट्रीय जीवनाला आकार देता आला पाहिजे.
अभिप्राय द्या